बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालय येथे आज ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पोलीस प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, मिरवणूक, वाहतूक व शिस्तीच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी DCP नारायण बरमनी, ACP संतोष सत्यनायक तसेच मार्केट CPI C.N. कालीमिरची यांच्यासह पोलीस अधिकारी आणि मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला बेळगाव शहरातील गणेशभक्तांमध्ये विशेष आकर्षण असून, मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठक आयोजित केली होती.

  • ४ सप्टेंबरला आगमन सोहळा

बैठकीत ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा आगमन सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या आगमन सोहळ्यासाठी आवश्यक परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे यंदाच्या वर्षी चव्हाट गल्ली मंडळाच्या वतीने अनंत चतुर्थी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने यंदा ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

चव्हाट गल्लीला बेळगावच्या गणेशोत्सवाच्या परंपरेत विशेष स्थान आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य सुरू आहे. आधुनिकतेसोबतच आपल्या पारंपरिक वाद्यांचा, संस्कृतीचा आणि धार्मिक परंपरांचा वारसा जपण्याचा संदेश यंदाच्या निर्णयातून देण्यात येणार आहे.

  • अनंत चतुर्थीला वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभाग

याशिवाय अनंत चतुर्थीच्या दिवशी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून नियोजित वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मिरवणुकीला होणारा विलंब टाळून प्रशासनाने आखून दिलेल्या नियोजनाला सहकार्य करण्याची भूमिका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

पोलीस प्रशासनानेही या निर्णयाचे स्वागत केले असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाला प्रशासनाकडून विशेष सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

  • चव्हाट गल्लीच्या शिस्तबद्ध परंपरेचे कौतुक

बेळगाव शहरातील गणेशोत्सवात चव्हाट गल्लीचे विशेष महत्त्व असून, या परिसराने आजपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा शिस्तबद्ध पद्धतीने जपल्या आहेत. चव्हाट गल्लीतील गणेशोत्सवाचा प्रभाव संपूर्ण बेळगाव शहरावर उमटत असल्याने या गल्लीतील गणेशोत्सव आणि मिरवणुकीचे नियोजन इतर मंडळांसाठीही आदर्श ठरावे, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, मिरवणुकीमध्ये शिस्त राहावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि धार्मिक-सांस्कृतिक वातावरण कायम राहावे, यासाठी प्रशासन आणि मंडळांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • बैठकीस मान्यवरांची उपस्थिती

यावेळी माजी आमदार ॲड. अनिल बेनके, ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, उपाध्यक्ष प्रशांत कुडे, ज्योतिबा पवार, उमेश मेनसे, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, कार्याध्यक्ष सुनील जाधव, विनायक पवार, ऋषभ मोहिते, प्रियेश गोंडाडकर, निखिल पाटील, निलेश गुंडकल, पवन किल्लेकर, अभिषेक नाईक, अनंत हंगेरगेकर, प्रसाद पवार, रोहन जाधव, संदीप कामुले, गिरीश पाटील, शुभम तुडेकर, हरीश ताशिल्दार ,गौतम पाटील यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस प्रशासन आणि ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध, पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.