• श्री वैश्य गरिमा मंचतर्फे आयोजन ; अध्यक्ष रोहन जुवळी यांची पत्रकार परिषदेत माहिती

बेळगाव : वैश्य समाजातील विविध उपजाती आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजबांधवांना एका व्यासपीठावर आणून समाजाची एकता, प्रगती आणि सन्मान अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने श्री वैश्य गरिमा मंच, कर्नाटक विभागातर्फे ६ सप्टेंबर रोजी बेळगावात स्थापना दिवस व ‘वैश्य संमेलन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंचाचे कर्नाटक विभागीय अध्यक्ष रोहन जुवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर कार्यालयात हे संमेलन होणार आहे. वैश्य समाजातील विविध संघटना, पदाधिकारी, नेते आणि समाजधुरीण या संमेलनात सहभागी होणार आहेत. समाजातील विविध उपजाती व प्रदेशांमध्ये निर्माण झालेली दरी कमी करून सर्वांना एका व्यासपीठावर आणणे, तसेच समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत सामूहिक विचारमंथन करणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

  • युवकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन 

वैश्य समाजातील युवकांना उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे आणण्यावरही संमेलनात विशेष भर देण्यात येणार आहे. नवउद्योजकांसाठी संधी निर्माण करणे, परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व्यावसायिक नेटवर्क उभारणे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विस्तारासाठी आवश्यक संपर्क व सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

तरुण उद्योजकांना मार्गदर्शन, संपर्क आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देत समाजाच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

  • सामाजिक उपक्रमांवरही होणार चर्चा

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या विविध क्षेत्रांत समाजबांधवांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उभारण्यावरही संमेलनात विचारविनिमय होणार आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करणे आणि विविध सेवा उपक्रमांमध्ये समन्वय साधण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे.

याशिवाय वैश्य समाजाचा सामूहिक आवाज अधिक प्रभावी करण्यासाठी आणि समाजासमोरील विविध प्रश्न सामूहिकरीत्या सोडविण्यासाठी भविष्यातील कृती आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे.

  • विविध उपजातींचे प्रतिनिधी सहभागी होणार

या संमेलनाला राष्ट्रीय अध्यक्ष शत्रुघ्न शाह, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र अग्रवाल, क्युरेटर विजय कुमार गर्ग (निवृत्त आयपीएस), राष्ट्रीय खजिनदार जय किशोर प्रसाद, कर्नाटक विभागीय अध्यक्ष रोहन जुवळी, कर्नाटक विभागीय सचिव दत्ता कणबर्गी, बेळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुंदडा आणि जिल्हा सचिव रमेश लाडा उपस्थित राहणार आहेत.

वैश्यवाणी समाज, कन्नड वैश्य समाज, माहेश्वरी समाज, गुजराती वैश्य समाज, अग्रवाल समाज, आर्य वैश्य समाज, सिंधी समाज यांसह विविध वैश्य समाजांच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती राहणार आहे.

‘वैश्य समाजाची एकता, प्रगती आणि सन्मान’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे संमेलन बेळगावातील वैश्य समाजातील विविध संघटना आणि उपजातींना एकत्र आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

या पत्रकार परिषदेला कर्नाटक राज्य श्री वैश्य गरिमा मंचचे मानद सचिव दत्ता कणबर्गी (वैश्यवाणी समाज), बेळगाव जिल्हा श्री वैश्य गरिमा मंचचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा (सीए, माहेश्वरी समाज), मानद सचिव रमेश लबलाड (गुजराती वैश्य समाज), डॉ. कश्मी वाणी संहार (सिंधी समाज), प्रमोद अग्रवाल (अग्रवाल समाज) यांच्यासह विविध समाजांचे नेते उपस्थित होते.