• बेळगावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य
  • अनधिकृत लेआउट्सवर कारवाईचे आश्वासन

बेळगाव : उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाच्या (बुडा) नूतन अध्यक्षपदाचा पदभार गुरुवारी स्वीकारला. यावेळी समर्थकांनी फटाके फोडून त्यांचे उत्साहात स्वागत केले. मावळते अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी आसिफ सेठ यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली.

याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना आसिफ सेठ यांनी बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे सांगितले. सर्व घटकांना सोबत घेऊन एकजुटीने काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील अनधिकृत लेआउट्सवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, मंत्रिपदाच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना आसिफ सेठ यांनी आपण स्वतःहून कोणत्याही पदाची मागणी केलेली नसल्याचे सांगितले. पक्षाच्या हायकमांडने सर्व बाबींचा विचार करून सरकार स्थापन केले असून, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही नेत्याने नाराज होण्याची गरज नसून पक्षाच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.