- कागवाड पोलिसांनी साताऱ्यातून केली अटक
कागवाड : तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या चोरीच्या प्रकरणांतील आरोपीला अटक करण्यात कागवाड पोलिसांना यश आले आहे. सागर महादेव पोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील रहिवासी आहे.
सागर पोळे याच्यावर सुमारे ११ चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप असून, या प्रकरणांनंतर कागवाड पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याची माहिती तपासातून समोर आली.
आरोपी सातारा जिल्ह्यातील जैतापूर येथे राहत असल्याची माहिती कागवाड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा निश्चित केला आणि कारवाई करत त्याला अटक केली.
तब्बल दोन दशकांपासून फरार असलेल्या आरोपीला शोधून काढत अटक केल्याबद्दल बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी कागवाड पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. आरोपीकडून यापूर्वीच्या चोरीच्या प्रकरणांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू आहे.








