बेळगाव : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारनिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात उद्या विशेष धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भगवान कपिलेश्वरांना एक लाखांहून अधिक बेलपत्रांची भव्य माळ अर्पण करण्यात येणार आहे.

बेळगावचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र असलेल्या कपिलेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी विशेष पूजा आणि धार्मिक विधींसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भगवान कपिलेश्वरांना अर्पण करण्यासाठी एक लाखांहून अधिक बेलपत्रांचा भव्य हार तयार करण्यात आला आहे.

विविध भगिनी तसेच मंदिर विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने हा आकर्षक आणि भक्तिपूर्ण हार तयार करण्यात आला आहे. उद्या विशेष पूजाविधीदरम्यान हा हार भगवान कपिलेश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

या अनोख्या धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी शेकडो शिवभक्त कपिलेश्वर मंदिरात उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. श्रावण महिन्यातील या विशेष सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांसाठी हा दिवस विशेष ठरणार आहे.