- मराठी साहित्याचा जागर करण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील प्रमुख केंद्रांमध्ये नांदी संमेलने
- बेळगावचीही निवड
पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ नांदी संमेलनांमध्ये बेळगावचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राबाहेरील महत्त्वाच्या मराठी केंद्रांमध्ये नांदी संमेलने आयोजित करण्याच्या नियोजनानुसार कर्नाटकातील बेळगावमध्येही साहित्यिक उपक्रमाचे आयोजन होणार आहे.
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतीचा जागर करण्यासाठी नांदी संमेलनांची आखणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झालेल्या विविध शहरांसोबतच महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांची मोठी संख्या असलेल्या शहरांनाही या उपक्रमात स्थान देण्यात आले आहे.
कर्नाटकातील मराठी भाषिकांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बेळगावचीही यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी साहित्यप्रेमी, लेखक, कवी आणि साहित्यिकांसाठी हे नांदी संमेलन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.
देशातील महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यांमध्ये एकूण १२ ठिकाणी नांदी संमेलने आयोजित केली जाणार असून त्यामध्ये दिल्ली, गुजरातमधील बडोदा व सुरत, मध्य प्रदेशातील इंदूर व ग्वाल्हेर, कर्नाटकातील बेळगाव, तेलंगणातील हैदराबाद तसेच पंजाबमधील घुमान यांचा समावेश आहे. याशिवाय परदेशातील १२ देशांमधील विविध शहरांमध्येही नांदी संमेलने होणार आहेत.
दुबई, सिंगापूर, सिडनी, लंडन तसेच अमेरिकेतील विविध शहरांमध्येही मराठी साहित्य आणि संस्कृतीचा जागर केला जाणार आहे. त्यामुळे १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देश-विदेशातील मराठी समाजाला जोडणारी ठरणार आहे.
बेळगावमध्ये होणाऱ्या नांदी संमेलनामुळे सीमाभागातील मराठी साहित्यिक आणि रसिकांना व्यासपीठ उपलब्ध होण्यासोबतच मराठी भाषेच्या समृद्ध साहित्य परंपरेचा जागर करण्याची संधी मिळणार आहे.








