- रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पी.बी. रोडजवळील तानाजी गल्ली ओव्हरब्रिज परिसरात रेल्वेच्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत विद्यार्थ्याची ओळख रोहित रमेश पाटील (रा. कोंडस्कोप, बेळगाव) अशी पटली आहे. त्याच्या खिशात आढळलेल्या बस पासच्या आधारे त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम बेळगावचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूली, शशिकांत अंबेवाडकर, विकी मेहता, मायकेल पिंटो आणि शुभम हूळी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेतून हलविला.
दरम्यान, दुर्घटनेच्या वेळी रोहितच्या कानात इयरफोन असल्याची माहिती समोर आली आहे. इयरफोनमुळे रेल्वे येत असल्याचा आवाज त्याला ऐकू आला नाही का, तसेच त्यातूनच दुर्घटना घडली का, याचा रेल्वे पोलीस तपास करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.








