- कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळेत २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान आणि आरोग्य जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने हॅपीहार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळा येथे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ अभियानांतर्गत आणखी एक तपासणी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले.
या शिबिरामध्ये एकूण २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ॲनिमियाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक मार्गदर्शन व तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पर्याय फाउंडेशनचे रोटरी क्लबतर्फे विशेष आभार मानण्यात आले. तसेच या समाजोपयोगी उपक्रमात योगदान देणाऱ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे आणि स्वयंसेवकांचेही कौतुक करण्यात आले.
हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी क्लब अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








