- दोघांना अटक : २४,७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : शहरातील वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल परिसरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ ऑगस्ट २०२६ रोजी कॅम्प पोलीस ठाण्याचे पीएसआय आर. आय. सनदी आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल परिसरात छापा टाकला. यावेळी गणेशपूर येथील लक्ष्मी नगरचा रहिवासी कौशिक कृष्ण मुदलियार (२२) आणि ज्योती नगर येथील चंद्रकांत अनिल थापा (१९) यांना गांजा विक्री करताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी गंगवाडी येथील मंजुनाथ याच्याकडून गांजा आणून शहरात विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २ किलो ६० ग्रॅम गांजा (किंमत १३ हजार रुपये), १,७३० रुपये रोख तसेच १० हजार रुपये किमतीचे व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण २४,७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक, पीएसआय आणि पथकातील कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.








