• युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेचा संयुक्त उपक्रम

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून युवा समिती मराठी शाळांचे संवर्धन, पटसंख्या वाढविणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहे. “मराठी शाळा टिकल्या तरच मातृभाषा टिकेल आणि मातृभाषा टिकली तरच आपली संस्कृती जपली जाईल,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सरचिटणीस श्रीकांत कदम, तसेच पदाधिकारी सुरज कुडुचकर आणि अक्षय बांबरकर यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाला शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि युवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी शाळांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.