बेळगाव : सीमाभागातील गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी ढोल-ताशा पथकांकडून वाद्यपूजन व सरावाचा शुभारंभ उत्साहात आणि पारंपरिक शिस्तीने केला जातो. याच परंपरेनुसार श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने जालगार मारुती मंगल कार्यालय, चव्हाट गल्ली बेळगाव येथे वाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी ढोल, ताशा आणि इतर वाद्यांना दैवी स्वरूप मानून गंध, फुले व अक्षता अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. आरतीनंतर पथकाने ढोल-ताशांचा गजर करत सरावाचा शुभारंभ केला.
कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह गजानन मिसाळे, गल्लीतील पंच प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिगंबर पवार, विश्वजीत हसवे, सुनील जाधव, भास्कर चव्हाण, बाळू नाईक, शंकर कांबळे, श्रीनाथ पवार, रघु उर्विन प्रफुल्ल शिरवळकर तसेच श्री शिवशंभू ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष पवन किल्लेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यंदा पथकातील ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
गेल्या दहा वर्षांपासून श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक बेळगाव शहरासह सीमाभागातील विविध ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आपली कला सादर करत आहे. पथकाला मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा जाता उर्वरित रकमेतील काही हिस्सा दरवर्षी समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी वापरला जातो. त्यामुळे कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पथकाने साधला आहे.
यंदाचा वाद्यपूजन सोहळा विशेष ठरला. वाद्यपूजन आणि सरावाच्या शुभारंभासोबतच पथकातील प्रत्येक कार्यकर्त्याचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. शिस्त, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “श्री शिवशंभू ढोल-ताशा पथकाचा हा केवळ वाद्यपूजनाचा कार्यक्रम नसून युवकांचे एक प्रकारचे वज्रमठ आहे. ढोल-ताशा पथकातील वाद्यपूजन हा गणेशोत्सवापूर्वी किंवा सरावाला सुरुवात करताना केला जाणारा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विधी आहे. या वाद्यांची मनोभावे पूजा केली जाते. बेळगावातील झांज पथकाची सुरुवात चव्हाट गल्लीपासूनच झाली आहे.”
पारंपरिक वाद्यांची जपणूक, युवकांमध्ये शिस्त व संघभावना निर्माण करणे, विद्यार्थ्यांचा गौरव तसेच सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या वाद्यपूजन सोहळ्याने आगामी गणेशोत्सवाच्या जल्लोषाची नांदी झाली.








