बेळगाव : फूड डिलिव्हरी व्यवसायातील बदलत्या व्यावसायिक परिस्थितीमुळे रेस्टॉरंट उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशन आणि नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) – उत्तर कर्नाटक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीत न्याय्य, पारदर्शक आणि शाश्वत व्यावसायिक पद्धतींसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संघटनांच्या भूमिकेला बेळगाव हॉटेल उद्योगाने एकमताने पाठिंबा जाहीर केला.
३० जुलै रोजी झालेल्या या बैठकीत बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला. स्विगी आणि झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर कंपन्यांकडून आकारले जाणारे उच्च कमिशन, सवलत धोरणे, एकतर्फी व्यावसायिक अटी आणि त्याचा रेस्टॉरंट व्यवसायाच्या शाश्वततेवर होणारा परिणाम याबाबत सदस्यांनी चिंता व्यक्त केली. योग्य तोडगा न निघाल्यास काही रेस्टॉरंट्सनी या प्लॅटफॉर्मवरील सेवा स्थगित करण्याचाही इशारा दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
चर्चेनंतर उपस्थित सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करून न्याय्य, पारदर्शक आणि शाश्वत व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यासाठी NRAI आणि कर्नाटक राज्य हॉटेल संघटनांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
यावेळी NRAI – उत्तर कर्नाटक विभागाचे प्रमुख अक्षय कुलकर्णी यांनी देशभरातील रेस्टॉरंट उद्योगासमोरील प्रमुख समस्या मांडताना, या प्रश्नांचा परिणाम केवळ व्यावसायिक नफ्यावरच नव्हे तर ग्राहकांचे दर, पर्याय, स्थानिक उद्योगांचे अस्तित्व आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकतेवरही होत असल्याचे सांगितले. रेस्टॉरंट उद्योग तंत्रज्ञान किंवा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या विरोधात नसून, सर्व घटकांच्या हिताचा समतोल राखणाऱ्या व्यावसायिक धोरणांची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय पई यांनी रेस्टॉरंट्स, फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर्स आणि ग्राहक हे या व्यवस्थेतील समान महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत, सर्वांना न्याय्य आणि पारदर्शक व्यवसाय पद्धतींचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले. एकतर्फी किंवा मक्तेदारीची व्यावसायिक पद्धत दीर्घकाळ टिकणारी नसल्याचे सांगून त्यांनी राज्य व राष्ट्रीय संघटनांच्या उपक्रमांना अधिकृत पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला.
बैठकीत संघर्षाऐवजी सकारात्मक संवाद, परस्पर आदर, निरोगी स्पर्धा आणि शाश्वत विकास यांवर आधारित व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून न्याय्य व्यावसायिक धोरणांची अंमलबजावणी व्हावी यासाठी कर्नाटक राज्य हॉटेल संघटना आणि NRAI यांच्या प्रयत्नांना बेळगाव हॉटेल उद्योग संपूर्ण पाठिंबा देईल, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीला बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय पई, NRAI उत्तर कर्नाटक विभागाचे प्रमुख अक्षय कुलकर्णी, असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, NRAIचे प्रतिनिधी तसेच बेळगावातील प्रमुख हॉटेल मालक आणि रेस्टॉरंट व्यावसायिक उपस्थित होते.








