बेळगाव : विजापूर येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य क्रिकेट निवड चाचणीसाठी धारवाड विभागीय यू-१९ क्रिकेट संघाची १५ सदस्यीय घोषणा करण्यात आली असून, या संघात बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या तब्बल चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्यामुळे बेळगावच्या क्रिकेट क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संघात सोहम पाटील, आशुतोष हिरेमठ, अर्णव कुंदप आणि जतिन पडती यांची निवड करण्यात आली आहे. आंतरक्लब स्पर्धा, आंतरजिल्हा सामने आणि विविध लीग स्पर्धांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या चौघांनी विभागीय संघात स्थान मिळवले आहे.
सोहम पाटील याने संपूर्ण हंगामात ५३ बळी घेत गोलंदाजीत आपली वेगळी छाप पाडली. जतिन पडती याने ९७६ धावा करत फलंदाजीत सातत्य राखले. अर्णव कुंदप याने ७७९ धावा आणि २४ बळी घेत अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रभावी कामगिरी केली, तर आशुतोष हिरेमठ यानेही सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेत संघात स्थान मिळवले.
या चारही खेळाडूंच्या निवडीमुळे बेळगावच्या क्रिकेटला नवी ऊर्जा मिळाली असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ते दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.








