- विशेष सघन पुनरावलोकन मोहिमेची पाहणी
- अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचा गौरव
बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR – Special Intensive Revision) मोहिमेचे प्रभावीपणे कामकाज पार पाडणाऱ्या बेळगाव महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. मोहिमेच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी त्यांनी बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या निवडणूक शाखेला आकस्मिक भेट दिली.
यावेळी उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांत सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेची तसेच संगणकीकरणाच्या कामाची सविस्तर माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. मोहिमेच्या यशासाठी विश्रांती न घेता परिश्रम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
विशेष म्हणजे, बोलण्यात अडचण असतानाही उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी विशाल माविनकट्टी यांच्या समर्पित सेवाभावाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व समन्वयामुळे एसआयआर मोहिमेत उल्लेखनीय प्रगती साधता आली असून, हे कार्य इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन परिसरातील उद्यानाच्या सुस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले.
महापालिकेचे महसूल विभागाचे उपआयुक्त तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एसआयआर मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी महापालिकेतील अधिकारी, पर्यवेक्षक तसेच एसआयआर मोहिमेतील कर्मचारी उपस्थित होते.







