• लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी घरोघरी पडताळणी
  • आवश्यक कागदपत्रांसह सहकार्याचे आवाहन

बेळगाव : गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी बेळगाव शहरात पुनर्तपासणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. आश्रय कॉलनी येथे आयोजित कार्यक्रमात महानगरपालिका नियुक्त सदस्य मुश्ताक मुल्ला यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानांतर्गत हेस्कॉमचे कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ओळखपत्र, वीज बिल, छायाचित्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. लाभार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन मुश्ताक मुल्ला यांनी केले. आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे न दिल्यास गृहज्योती योजनेच्या लाभावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेस्कॉमचे अधिकारी डी. व्ही. अंदिगुंदी यांनी सांगितले की, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सूचनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागात लाभार्थ्यांची पुनर्तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मतदार ओळखपत्र, वीज बिल आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुनर्तपासणी अभियानाचा पुढील टप्पाही लवकरच राबविण्यात येणार असून, सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

या कार्यक्रमाला संगीता संगडी, कल्लप्पा, सैयदा यांच्यासह स्थानिक नेते, हेस्कॉमचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.