• पावसाच्या सरींमुळे दिलासा ; मात्र गेल्या दहा दिवसांतील पावसाच्या खंडामुळे वाढीचा वेग मंदावला

बेळगाव : शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत असली तरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १०.०८ फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रासह बेळगाव शहर आणि तालुक्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असून, शेतकऱ्यांच्या पिकांनाही त्याचा काहीसा दिलासा मिळत आहे.

सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २४६४.७० फूट इतकी नोंदविण्यात आली असून, जलाशय पूर्ण भरावयास आणखी १०.०८ फूट पाण्याची गरज आहे. यंदा जून महिनाभर समाधानकारक पाऊस न झाल्याने जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभी सलग आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आणि जलाशयाची पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे शहरवासीयांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला.

तथापि, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने पाणीपातळीतील वाढीचा वेग मंदावला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू लागली असून, जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.

हवामानातील बदलत्या परिस्थितीकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास राकसकोप जलाशय लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.