• पोलीस तपासाला सुरुवात ; जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा संशय

बेळगाव : शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयालगत असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या थरारक गोळीबाराने एकच खळबळ उडाली. रमी खेळत असलेल्या सुरेश जाळगार यांच्यावर पाच जणांच्या टोळीने कथितपणे हत्येचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी आरोपीला जोरदार धक्का देऊन तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर आरोपींनी हवेत दोन फैरी झाडत घटनास्थळावरून पलायन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाळगार हे युनियन जिमखाना क्लबमध्ये रमी खेळत असताना पाच जणांचा एक गट तेथे दाखल झाला. त्यापैकी दोघे बाहेर थांबले, तर तिघे थेट क्लबमध्ये प्रवेश करून सुरेश यांच्याजवळ पोहोचले. यावेळी एका आरोपीने त्यांच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरेश यांनी आरोपीला ढकलून तत्काळ घटनास्थळावरून धूम ठोकल्याने मोठी दुर्घटना टळली.

हल्ला अयशस्वी ठरल्यानंतर आरोपी क्लबबाहेर आले आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत आणखी दोन गोळ्या झाडून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. दरम्यान, पोलिसांनी सुरेश जाळगार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत सुरेश यांनी यापूर्वी प्रफुल्ल नावाच्या व्यक्तीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत, त्याचाच सूड उगवण्यासाठी प्रफुल्ल पाटीलच्या साथीदारांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून या दाव्याची पडताळणी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि त्यांच्या हालचालींचा तपास वेगाने सुरू आहे.

कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.