- १९ वर्षांखालील महिला आंतर-ग्रामीण क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर
- झोया इम्तियाज काझी उपकर्णधार
हुबळी : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए)तर्फे प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील महिला आंतर-ग्रामीण विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी धारवाड विभागीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी सलामीवीर फलंदाज श्रेया पोटे तर उपकर्णधारपदी झोया इम्तियाज काझी हिची निवड करण्यात आली आहे.
केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, ती २३ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत बंगळुरूत रंगणार आहे. २२ जुलै रोजी महाराणी ट्रॉफी स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार असून, ग्रामीण भागातील महिला क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.
धारवाड विभागाचे निमंत्रित वीरण्णा सवदी यांनी सोमवारी ४१ सदस्यीय संघाची घोषणा केली. अंतिम संघात श्रेया पोटे (कर्णधार), झोया इम्तियाज काझी (उपकर्णधार), आराधना हेब्बीकर, प्रार्थना बी. गौडा (यष्टीरक्षक), अपूर्वा अशोक होसवक्की, सिमरा लोंदेवाले, रिमझिम शुक्ला, अनुषा एस. मेनासिनाके, हर्षिता विक्रम नायक, अन्वी समीर यळ्ळूरकर, वैष्णवी श्रीकांत कांबळे, साक्षी कुबेर मुनवळ्ळी आणि मनुश्री राजेश कुर्थाकोटी यांचा समावेश आहे.
राखीव खेळाडू म्हणून निधी पाटील, त्रिवेणी गर्लगुंजी आणि दिशा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे प्रशिक्षक मल्लिकार्जुन बी., तर व्यवस्थापक म्हणून प्रद्या खिलारे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
श्रेया पोटे हिला कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य व धारवाड विभागीय क्रिकेट समितीचे माजी सन्मान्वयक अविनाश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच क्रिकेट प्रशिक्षक फिरोज शेख , फिटनेस प्रशिक्षक ओंकार मोटर आणि सतीश मोरे यांचे सहकार्य लाभले आहे.








