- चारही गटांमध्ये भव्य पारितोषिके पटकावली
बेळगाव : विद्या भारतीच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शिंदोळी येथील देवेंद्र जिनगौडा शाळेने दैदिप्यमान कामगिरी करत सहभागी झालेल्या चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. प्राथमिक व माध्यमिक मुलगे आणि मुली अशा सर्व गटांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेने जिल्हास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
गणेशपूर-हिंडलगा येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात देवेंद्र जिनगौडा शाळेने संत मीरा गणेशपूर संघाचा ७ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. तर प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यात शांतीनिकेतन स्कूल, खानापूरचा ११ गुणांनी पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले.
माध्यमिक मुलांच्या उपांत्य फेरीत संत मीरा गणेशपूरने संत मीरा अनगोळचा ७ गुणांनी पराभव केला, तर देवेंद्र जिनगौडा शाळेने शांतीनिकेतन पब्लिक स्कूलवर ७ गुणांनी मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात संत मीरा गणेशपूरचा पुन्हा ७ गुणांनी पराभव करत देवेंद्र जिनगौडा शाळेने विजेतेपद पटकावले.
माध्यमिक मुलींच्या अंतिम सामन्यातही देवेंद्र जिनगौडा शाळेने शांतीनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरवर ११ गुणांनी विजय मिळवत चौथ्या गटातही अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.
समारोप समारंभात मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, शिवकुमार सुतार, गंगा गनिकोप्पा आणि सागर कोळेकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी स्वाती सावंत, शिवकुमार, पूर्णिमा बढेकाई, सुजित नेरुळकर आणि सूरज देसुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले, तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.







