• मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती

बेळगाव : राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पावसाची स्थिती, पिकांची अवस्था आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हानिहाय परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती आणि खरीप पिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागांना भेटी देण्यात येत आहेत.

बसवकल्याण येथून या दौऱ्याला सुरुवात झाली असून, त्यानंतर बिदर आणि कलबुर्गी जिल्ह्यांचा दौरा पूर्ण करून आपण बेळगावमध्ये दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी सरकारमधील प्रमुख मंत्रीही उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले असून, स्थानिक प्रश्न, पावसाची स्थिती, शेती, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित विविध विषयांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशीही सविस्तर संवाद साधण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत सर्वांनी एकत्रितपणे विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.