- नद्या-जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ
बेळगाव : बेळगावसह खानापूर, निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा आदी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठाही दोन फुटांनी वाढला आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही भागांमध्ये सखल परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बुधवारी सकाळपासूनही पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने मात्र नदीकाठच्या आणि पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








