- पूरस्थिती गंभीर : अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
बेळगाव : महाराष्ट्रासह सीमाभागात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील १६ हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. चिकोडी उपविभागातील आठ छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
मुळंकी–दत्तवाड, कारदगा–भोज, अकोळ–सिदनाळ, जत्राट–भिवशी, बारवाड–कन्नूर आणि भोजवाडी–गजवरवाडी या जोडपुलांसह अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्यांतही संततधार पाऊस सुरू असून, जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत सरासरीपेक्षा १३४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्रातून कृष्णा नदीत सुमारे २८ हजार क्युसेक अतिरिक्त पाण्याची आवक झाली असून, जिल्ह्यातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा आणि मार्कंडेय या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर किंवा त्यापेक्षा वरून वाहत आहेत. दूधगंगा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या शेतजमिनीत पाणी शिरले आहे.
निपाणी तालुक्यातील शिरडवाड गावातील ज्वारी, उडीद आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, निपाणी आणि चिकोडी तालुक्यांतील आठ प्रमुख पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.








