• नदीत ५३ हजार क्युसेक पाण्याची आवक
  • संपर्क तुटल्याने भाविकांसह नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार

चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीत सुमारे ५३ हजार क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील येडूर–कल्लोळ संपर्क पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांतील संपर्क तुटला आहे.

पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

येडूर–कल्लोळ पूल पाण्याखाली गेल्यामुळे प्रसिद्ध श्री वीरभद्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. सध्या संपर्क तुटल्याने भाविकांसह नागरिकांना अंकली व मांजरी मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन केले आहे.