• दत्त मंदिरापर्यंत पोहोचले पुराचे पाणी
  • कृष्णा – पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
  • संगमेश्वर मंदिर पाण्याखाली ; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

शिरोळ : महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दिसून येत आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या २४ तासांत सुमारे १० फुटांनी वाढ झाल्याने पुराचे पाणी आता श्री दत्त मंदिराच्या परिसरापर्यंत पोहोचले असून, भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. मंदिर परिसरातील पूजासाहित्य, फर्निचर आणि अन्य आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, कृष्णा – पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. नद्यांचा प्रवाह अद्याप वेगाने सुरू असल्याने नदीकाठच्या भागात पुराचा धोका वाढला आहे.

दररोज महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारो भाविक श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीने भाविक व पर्यटकांना नदीकिनारी जाणे टाळावे आणि सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.