• क्लाउड सीडिंगची गरज नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली असून, सध्या हावेरी मॉडेलनुसार क्लाउड सीडिंग करण्याची गरज नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या राकसकोप जलाशयात पाच नद्यांमधून पाण्याची आवक सुरू झाली आहे. यंदा पावसात सुमारे २९ टक्के तूट असली तरी पुढील तीन ते चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास ही तूट भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री जारकीहोळी म्हणाले की, जिल्ह्यातील पेरणीचे काम समाधानकारक झाले आहे. भविष्यात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून स्वतंत्र सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

कित्तूर आणि बैलहोंगल परिसरातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. पावसाळा संपल्यानंतर डिसेंबरमध्ये कायमस्वरूपी रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील एल अँड टी कंपनीच्या रखडलेल्या कामांबाबतही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून, ती लवकर पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील पदपथ आणि रस्त्यावरील विक्रेत्यांवरील कारवाईबाबत त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही मोहीम राबवली जात आहे. मात्र, गरीब विक्रेत्यांना आपला माल सुरक्षितपणे हलविण्यासाठी पुरेसा वेळ देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात येतील. तसेच नियमांनुसार त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावरही भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

यमकनमर्डी येथील स्वामीजींवरील हल्ल्याच्या प्रकरणावर बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, या प्रकरणाचा निर्णय संबंधित समिती आणि स्वामीजी स्वतः घेतील. या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणुका जवळ आल्याने अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होत राहतील, अशी प्रतिक्रिया दिली.