• विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या आरोपानंतर युवकाच्या घरावर झाला होता हल्ला

बेळगाव : तालुक्यातील भरम्यानट्टी गावात विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या आरोपावरून एका युवकाच्या घरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याप्रकरणी मारीहाळ पोलिसांनी तातडीची कारवाई करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. नागराज बाळाप्पा नाईक (वय ३३) , रवी सत्येप्पा बिजगट्टी (वय ४०) आणि ईश्वर शिवप्पा मुचंडी (वय २२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी भरम्यानट्टी गावातील यल्लाप्पा नायक याच्यावर एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संतप्त जमावाने त्याच्या घरावर धाड टाकून घरातील सदस्यांना मारहाण केली तसेच फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, दरवाजे, खिडक्या आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंबीयांनी हल्लेखोरांनी घराशेजारी बांधलेली एक मेंढीही चोरून नेल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेप्रकरणी यल्लाप्पाच्या वडिलांनी मारीहाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नागराज बाळाप्पा नाईक, रवी सत्येप्पा बिजगट्टी आणि ईश्वर शिवप्पा मुचंडी यांच्यासह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली.

तपासादरम्यान मारीहाळ पोलिसांनी वेगाने हालचाली करत तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी संबंधित विवाहित महिला आणि तिचा पती बसप्पा यांचे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कायदा हातात घेऊन हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून, या प्रकरणाचा अधिक तपास मारीहाळ पोलीस करत आहेत.