- प्रशासकीय कारणास्तव उद्याची बैठक रद्द
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ३० जून रोजी मुंबईतील विधान भवन येथे होणारी उच्चाधिकार समितीची बैठक अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. या बैठकीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
ही बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत पत्रकाद्वारे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले. बैठकीची पुढील तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सीमाप्रश्नासंदर्भातील ही महत्त्वाची बैठक अचानक लांबणीवर पडल्याने प्रदीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सीमाभागातील नागरिकांमध्ये तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा सदस्य शरद पवार, लोकसभा सदस्य नारायण राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यासह राज्य सरकारचे महाधिवक्ता मिलिंद साठे तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते.
दरम्यान, सीमाप्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही बैठक आता नेमकी कधी होणार, याकडे सीमावासीयांचे लक्ष लागले आहे.








