• बार असोसिएशनकडून फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप
  • वकिलांनी व्यक्त केला आनंद

बेळगाव : कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीत बेळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ आय. एम. पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत यश संपादन केले. त्यांच्या विजयाबद्दल बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने शहरात जल्लोषात विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बार असोसिएशनच्या सदस्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात विशेष पूजा केली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपस्थित वकिलांनी आय. एम. पाटील यांच्या निवडीमुळे राज्यभरातील वकिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रभावी प्रयत्न होतील, असा विश्वास व्यक्त केला.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आय. एम. पाटील यांनी निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल राज्यभरातील वकील बांधवांचे आभार मानले. “वकिलांची सेवा करण्याची मिळालेली ही संधी सार्थ ठरवत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि कल्याणासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या विजयोत्सव कार्यक्रमाला बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ वकील तसेच मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.