बेळगाव : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बेळगाव जिल्हा पोलिसांनी युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्हाभर राबविलेल्या जनजागृती सप्ताहाची यशस्वी सांगता झाली. २२ ते २६ जून या कालावधीत विविध उपविभागांमध्ये रॅली, जनजागृती सभा आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल, रामदुर्ग, गोकाक, चिक्कोडी आणि अथणी उपविभागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गोकाक आणि चिक्कोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

यावेळी अमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम नागरिकांसमोर मांडण्यात आले. तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

बेळगाव जिल्हा ‘ड्रग्जमुक्त’ करण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. अमली पदार्थांची अवैध विक्री किंवा तस्करीबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले.

अमली पदार्थांविरोधातील जनजागृती आणि कठोर कायदेशीर कारवाई या दोन्ही माध्यमांतून बेळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाचे ‘ड्रग्जमुक्त समाज’ अभियान पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.