- मृत्यू प्रकरणी संतप्त ग्रामस्थांची चौकशीची मागणी
बेळगाव : बेळगावजवळील औद्योगिक परिसरातील हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात निषेध व्यक्त केला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मुत्त्यानट्टी येथील रहिवासी शंकर तळवार (वय २४) यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक संदेश प्रसारित केल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये नोकरीसंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईक कंपनी परिसरात जमले. मृत्यूबाबत सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी दगडफेकीची घटना घडल्याचेही वृत्त आहे, ज्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. पोलीस आयुक्त भूषण बोरसे तसेच स्थानिक आमदार आसिफ सेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी कंपनी स्थापनेच्या वेळी रोजगारासंदर्भात देण्यात आलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत काही मुद्दे उपस्थित केले. तसेच मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य पुनर्वसन देण्याची मागणीही करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, माळमारुती पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून आत्महत्येची कारणे आणि संबंधित आरोपांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.








