• उत्तर प्रदेशातील ११ जणांना अटक
  • कागवाड – अथणी पोलिसांची संयुक्त कारवाई
  • पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची पत्रकार परिषदेत माहिती

बेळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अथणी उपविभागाच्या हद्दीत बसमधील प्रवाशांना मदतीचे आमिष दाखवून किंवा कृत्रिम गर्दी निर्माण करून त्यांच्या बॅगा आणि दागिने चोरणाऱ्या टोळीबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या टोळीचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. त्यानंतर कागवाड आणि अथणी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून उत्तर प्रदेशातील ११ जणांच्या टोळीला अटक करण्यात यश मिळवले.

तपासादरम्यान या टोळीचा कागवाड परिसरातील चार, चिक्कोडीतील एक आणि अथणीतील एका चोरीच्या घटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. आरोपी प्रवासादरम्यान महागडे दागिने घातलेल्या किंवा मौल्यवान वस्तू बाळगणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण २२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, चोरीला गेलेल्या बहुतांश सोन्याची पोलिसांनी पुनर्प्राप्ती केली आहे. या टोळीच्या अटकेमुळे परिसरातील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेवर भर देत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, बस प्रवास करताना आपल्या बॅगा, दागिने आणि मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.