मण्णूर : मण्णूर गावातील एक एकर जमिनीवर कथितरीत्या ‘मारिया कृपा सोसायटी’च्या नावाचा फलक लावण्यात आल्याच्या प्रकारावरून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या जमिनीच्या प्रस्तावित वापरास विरोध दर्शवत ग्रामस्थांनी देवस्की पंच कमिटीच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

देवस्की पंच कमिटीच्या वतीने मण्णूरचे तलाठी महेंद्र पत्तार तसेच आंबेवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी चिदानंद जंबगी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित जमिनीला मंजुरी देण्यात आल्यास त्याला ग्रामस्थांचा विरोध राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील संबंधित जमिनीवर ‘मारिया कृपा सोसायटी’ या नावाचा फलक लावण्यात आला असून, ही प्रक्रिया अनधिकृत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ग्रामस्थांचे म्हणणे विचारात घ्यावे आणि सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना देवस्की पंच कमिटीचे चेअरमन मुकुंद भावकू तरळे, विनय कदम, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, रवी चौगुले, अरुण सांबरेकर, संदीप डोणकरी, संतोष केंचन्नावर, महादेव डोणकरी, निखिल चौगुले, रामा चौगुले, दशरथ मंडोळकर, मल्लाप्पा बाळेकुंद्री, उमेश चौगुले, मारुती मंडोळकर, अजित डोणकरी, सतीश बोंगाळे, अप्पू कटगी यांच्यासह मण्णूर गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.