• बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
  • २३,५०० रुपयांची रोकड जप्त

बेळगाव : तालुक्यातील बोकनूर गावाच्या हद्दीत असलेल्या सावगाव तलाव परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावगाव तलावाजवळील सार्वजनिक वनक्षेत्रातील मोकळ्या जागेत काही जण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सोमवारी, १५ जून रोजी छापा टाकला. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून २३ हजार ५०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणात विजय श्रीनिवास नायडू (वय ५४, गुडशेड रोड), एकनाथ सदाशिव पवार (वय ३७, अलतगा), हारून मेहबूब मुल्ला (वय ६०, वैभवनगर), स्वप्नील उमाकांत हुंद्रे (वय ३०, सरस्वतीनगर), कल्लाप्पा तम्मण्णा अष्टेकर (वय ६२, तुरमुरी), सुनील बाबू बुवा (वय ४३, उचगाव), बाळू सुब्बण्णा नाईक (वय ४०, सोनारवाडी, कोल्हापूर) आणि अजय मधू मंडलिक (वय २३, बेनकनहळ्ळी) या आठ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टमणीगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जुगार आणि इतर अवैध प्रकारांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.