• मराठी शाळेत कन्नड वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थगित
  • पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे आश्वासन

बेळगाव : सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थ, पालक आणि शाळा सुधारणा समितीने तीव्र विरोध दर्शवल्यानंतर शिक्षण विभागाला अखेर माघार घ्यावी लागली. मराठी शाळेत कन्नड वर्ग सुरू करण्याऐवजी पर्यायी जागेची व्यवस्था करून तेथे कन्नड शाळा भरविण्याचे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्याने ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात येत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने निवेदन देण्याची तयारी ग्रामस्थांनी केली होती. मात्र परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) यांनी थेट सावगाव शाळेत भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली.

यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना एक महिन्याचा कालावधी देण्याची विनंती करत कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर ग्रामस्थांनी जुनी शाळा स्वच्छ करून तिचा वापर करण्याची सूचना केली. तसेच जुनी इमारत दुरुस्त होईपर्यंत भाडेतत्त्वावर जागा घेऊन शाळा चालविण्याची तयारीही दर्शविली. त्यासाठी लागणारा खर्चही उचलण्याची तयारी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत मराठी माध्यमाच्या शाळेत कन्नड शाळा सुरू करू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

ग्रामस्थांच्या भावना आणि मागणीची दखल घेत क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी पर्यायी जागा शोधून तेथे कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याचे मान्य केले. त्यामुळे मराठी शाळेचे अस्तित्व कायम राखण्यात यश आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सांगावकर, बेळगाव क्षेत्र शिक्षणाधिकारी दान्नामा जाळकी, शिक्षण संयोजक बडीगेर, क्लस्टर प्रमुख सतीश पाटील, मुख्याध्यापक एल. एस. चांदीलकर, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, मोतेश बारदेसकर, अनिल हेगडे, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, बसवंत घाटेगस्ती, निंगाप्पा मोरे, परशराम आकनोजी, यल्लापा पाटील, दर्शन घाटेगस्ती, प्रदीप मोरे, योगेश आकनोजी, महेश कदम, निकिता पाटील, रेखा घाटेगस्ती, अनिता बसरीकट्टी, सुजाता काकतकर आदी उपस्थित होते.