• कोट्यवधींच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी

बेळगाव : टिळकवाडी परिसरातील ‘आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ या वित्तीय संस्थेविरोधात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर प्रशासनाने सुरू केलेली चौकशी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवली. कंपनीच्या व्यवहारांबाबत विविध विभागांकडून संयुक्त तपास मोहीम राबविण्यात येत आहे.

बेळगावचे सहायक आयुक्त श्रावणकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, सहकार विभाग आणि सायबर गुन्हे शाखेचे अधिकारी कंपनीच्या कागदपत्रांची, आर्थिक व्यवहारांची आणि बँक खात्यांची तपासणी करत आहेत. गुरुवारी कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.

या प्रकरणातील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलराज माने अद्याप चौकशीसाठी उपस्थित झाले नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीचे जाळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातसह विविध राज्यांमध्ये पसरले असून देशभरात तिच्या नऊ शाखा कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

तपास यंत्रणांनी आतापर्यंत हजारो गुंतवणूकदारांशी संबंधित माहिती संकलित केली आहे. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती मिळविताना अडचणी येत असल्याचेही समजते. त्यामुळे व्यवस्थापकांसह अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत असून आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि नोंदी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

कार्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तपास यंत्रणा सर्व व्यवहारांची बारकाईने छाननी करत आहेत. या प्रकरणातील सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशीची मागणी गुंतवणूकदारांकडून केली जात आहे.