- रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक ; दरकपातीसाठी केंद्राला इशारा
बेळगाव : एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसच्या वतीने बेळगावात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी भररस्त्यात चूल मांडून स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला. यावेळी दरवाढ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला सात दिवसांची मुदत देण्यात आली.
राणी चन्नम्मा चौकात आयोजित आंदोलनात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून चहा आणि जेवण तयार केले. तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ नागरिकांना वाटप करत त्यांनी महागाईच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान आयेशा सनदी यांनी केंद्र सरकारवर टीका करत इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. गॅस दरवाढीच्या विरोधात पूर्वी आंदोलन करणारे भाजपचे नेते आता शांत का आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुढील सात दिवसांत एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न झाल्यास दिल्लीत जाऊन अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा लता शिवाजीराव माने यांनी महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य आणि कष्टकरी कुटुंबांना बसत असल्याचे सांगितले. वाढत्या दरांमुळे घरगुती अर्थसंकल्पावर ताण निर्माण झाला असून महिलांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात गॅरंटी योजनांचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.








