• महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्यावतीने आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे १ जून रोजी पाळल्या जाणाऱ्या हुतात्मा दिनात सीमाभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, कन्नड सक्तीविरोधी लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच कन्नड सक्तीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास व्यापक पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच सीमाप्रश्नाच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या एक लाख सह्यांच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. या मोहिमेसंदर्भात घटक समित्यांच्या बैठका घेऊन आपला निर्णय कळवावा, असेही सांगण्यात आले.

तसेच १ जून रोजी हिंडलगा येथील कार्यक्रमास सीमावासीयांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या दिवशी मोर्चाचे आयोजन करेल, त्या मोर्चातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन युवा समिती सीमाभागतर्फे करण्यात आले.

बैठकीस सरचिटणीस मनोहर हुंदरे, पिराजी मुंचडीकर, इंद्रजित धामणेकर, नारायण मुंचडीकर, मोतेश बारदेसकर, सुधीर शिरोळे, सचिन दळवी, रमेश माळवी, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, निलेश काकतकर, राजू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.