- तिजोरीची चावी चोरून ९३० ग्रॅम दागिने लंपास
- कॅम्प पोलिसांकडून संशयिताला अटक
बेळगाव : घरातील विश्वासू व्यक्तीनेच मालकाच्या तिजोरी फोडून तब्बल ९३० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. तिजोरीची चावी चोरून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या संशयिताला कॅम्प पोलिसांनी अटक करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. कॅम्प परिसरातील रहिवासी डॉ. विश्वनाथ धडेद यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा धडेद यांनी ११ मे रोजी तक्रार दाखल केली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त निरंजनराजे अर्स, खडे बाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा आणि कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तपासा दरम्यान घरातच काम करणारा कागवाड येथील राहुल सतीश कांबळे याच्यावर संशय बळावला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासात राहुलने कागवाडमधील बाबासाहेब कटगेरी याच्या माध्यमातून चोरीचे सोने विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून ५२.५ लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोने हस्तगत केले असून, काही सोने खाजगी फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवून त्यावर २२.८ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ७३.३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित सोन्याचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाला रोख बक्षीस जाहीर केले. तसेच नागरिकांनी घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.







