बेळगाव : ४५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णावर यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) बेंगळूरहून बेळगावात आणले आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडी पथकाने शिवानंद नीलन्नावर यांना मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना बेंगळूरहून बेळगावातील माळमारुती पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सीआयडी कोठडी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तपासाचा भाग म्हणून अभिनेते तथा करवे जिल्हाध्यक्ष अभिलाष सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले असून, सीआयडीच्या डीवायएसपींनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती.

यापूर्वी मुख्य संशयित शिवानंद नीलण्णावर याची पत्नी आणि भागीदार सुभाष यांच्यासह अभिलाष यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. तपासादरम्यान शिवानंद नीलण्णावर याने अभिलाष यांना एक महागडी सेकंड हँड मर्सिडीज कार भेट म्हणून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बेळगाव उत्सव कार्यक्रम पार पडल्यानंतर नीलण्णावर याने अभिलाष यांना सुमारे १७ लाख रुपये किमतीची मर्सिडीज कार दिल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर कारची खरेदी आणि मालकी हक्काच्या कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश सीआयडीने दिले होते.

या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि भेट दिलेल्या कारबाबत सीआयडीचे अधिकारी सध्या अभिलाष यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आगामी काळात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.