• भररस्त्यात मालाची चढ-उतार ; नागरिक त्रस्त
  • शहापूरसह उपनगरांमध्ये परिस्थिती गंभीर

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी ही आता केवळ दैनंदिन समस्या न राहता गंभीर नागरी प्रश्न बनला आहे. पोलीस विभागाने अवजड वाहनांच्या शहर प्रवेशावर निर्बंध घातले असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. भरदिवसा रस्त्यावरच अवजड वाहनांचे थांबणे तसेच मालाची चढ-उतार सुरू असल्याने नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

असाच प्रकार शहापूरमधील भारत नगर तिसरी गल्ली परिसरात सातत्याने पाहायला मिळत आहे. येथे एका ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय असून मोठी अवजड वाहने दिवसभर रस्त्यावर उभी केली जातात. याच ठिकाणी मालाची चढ-उतार केली जात असल्याने अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते.

याशिवाय छोट्या मालवाहू वाहनांचीही रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने परिस्थिती अधिकच बिघडते. परिणामी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना रोजच्या रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वाहनचालक व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडत असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री किंवा पहाटे मालाची चढ-उतार केल्यास कोणतीही हरकत नाही, मात्र भरदिवसा होणाऱ्या या प्रकारामुळे मोठा त्रास होत आहे. याबाबत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला माहिती देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस तसेच वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. शहर व उपनगरांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी घालण्यात आलेल्या वेळेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांच्या लोडिंग-अनलोडिंगवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे मत आहे.