- बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
- मराठी भाषिकांना सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : व्यावसायिक नामफलकांवर कन्नड भाषेची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ येत्या १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठकीत कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन, मराठी नामफलकांचा प्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील वाढत्या दबावाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनोहर किनेकर यांनी दिली. येत्या १ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता हिंडलगा येथे एकत्र येऊन कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नामफलकांवर ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के मराठी अथवा इतर भाषा असाव्यात असा कायदा असताना त्याची अंमलबजावणी सरकारी कार्यालयांमध्ये होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच बेळगाव शहरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी नामफलक हटविण्याचे प्रकार सुरू असल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या सर्व घटनांच्या निषेधार्थ १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मनोहर किणेकर यांनी दिली. या मोर्चामध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले.







