• अँटी स्टॅबिंग स्कॉडची कारवाई ; धारदार कोयता जप्त

बेळगाव : शहरातील मारुतीनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार कोयता घेऊन फिरत दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला माळमारुती पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग स्कॉडने अटक केली आहे. आरोपीकडून लांब धारदार ऊसतोडणी कोयताही जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव लालूखान बाबूखान पठाण (वय ५०, रा. मारुतीनगर, बेळगाव) असे आहे.

शहरात वाढत्या स्टॅबिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहर आणि ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अँटी स्टॅबिंग स्कॉड कार्यान्वित केले आहेत.

बुधवारी माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना स्कॉडच्या पथकाला मारुतीनगर तिसऱ्या क्रॉसजवळ लालूखान पठाण हा हातात कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. तो दहशत निर्माण करण्याच्या अथवा गैरकृत्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला.

यानंतर स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील धारदार कोयता जप्त केला. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल पोलीस – उपायुक्तांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.