बेळगाव : तालुक्यातील बाकनुर आणि बडस गावांच्या फाट्यावर भाजपा बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलकाचे नुकतेच उत्साहात अनावरण करण्यात आले.

बाकनुर गावातील श्री महालक्ष्मी यात्रेदरम्यान अनेक भाविक आणि नातेवाईकांना गावाकडे जाण्याचा मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः बाकनुर आणि बडस फाट्यावर दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांनी धनंजय जाधव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत स्वखर्चातून कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलक उभारला.

नुकत्याच पार पडलेल्या अनावरण सोहळ्यात पूजाविधी करून फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच श्रीफळ वाढवून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या उपयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत धनंजय जाधव यांचे आभार मानले.

कार्यक्रमास के. डी. पाटील, संदीप गोडसे, के. एन. पाटील, नामदेव गोडसे, प्रल्हाद गुरव, संजय पाटील, गोपाल गावडे, निंगु गावडे, दीपक नाईक, संभाजी नाईक, चेतन पाटील, गोपाळ पाटील, बाळू चंदिलकर, प्रकाश सुतार, कल्लाप्पा कांबळे, अनिल पाटील, पराशराम पाटील यांच्यासह बडस, बाकनुर आणि बेळवट्टी येथील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.