• जिल्ह्यातील पोलीस खात्यात व्यापक फेरबदल

बेळगाव : राज्य गृह विभागाकडून शनिवारी राज्यभरातील २९३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या फेरबदलामध्ये बेळगाव जिल्हा तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असून टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्यांमध्ये नव्या निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कारवार येथील हेस्कॉम जागृत पथकात कार्यरत असलेले निरीक्षक गोपाळ आर. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजारी यांची खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निरीक्षक शशिकांत वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहापूर आणि टिळकवाडी ही संवेदनशील पोलीस ठाणी मानली जात असल्याने अनुभवी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवशरण अवजी यांची मंगळूर येथे बदली करण्यात आली असून खानापूर पीटीएसमधील निरीक्षक राजू रावसाहेब पाटील यांची बनहट्टी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.