• शिवतेज युवा संघटनेचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : मच्छे, वाघवडे आणि देसूर परिसरातील युवकांनी रविवारची सुट्टी समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करत राजहंसगड स्वच्छतेचा उपक्रम राबविला. पर्यटनस्थळी मौजमजा करण्याऐवजी गड संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने या तरुणांचे कौतुक होत आहे.

मच्छे येथील शिवतेज युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी तसेच १० तारखेला युवकांनी राजहंसगड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. गड परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या बाटल्या आणि अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

बेळगाव तालुक्यातील राजहंसगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित महत्त्वाचा गड मानला जातो. अलीकडच्या काळात येथे पर्यटकांची संख्या वाढू लागली असून शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि पर्यटक भेट देत आहेत. निसर्गरम्य वातावरणामुळे प्री-वेडिंग शूटसाठीही अनेक जोडपी येथे येत असल्याचे दिसून येते. मात्र काही ठिकाणी मद्यपान करून बाटल्या व कचरा टाकण्याचे प्रकारही वाढले आहेत.

गड परिसरात वाढणारा प्लास्टिक व इतर कचरा लक्षात घेऊन युवकांनी “एक दिवस गड संवर्धनासाठी” हा संदेश देत स्वच्छता मोहीम हाती घेतली. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचे प्रतीक असलेले गड-किल्ले जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी युवकांनी व्यक्त केली.

शिवतेज युवा संघटनेच्या या उपक्रमामुळे इतर तरुणांसमोरही सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे.