- रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यासह तीन आरोपी अटकेत
बेळगाव : बेळगाव : शहरात अवैध कारवायांवर पोलिसांनी धडक कारवाई करत आयपीएल सट्टेबाजी रॅकेट उघडकीस आणले असून रिव्हॉल्वर बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीएसआय हुसेनसाब केरुर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आयपीएल क्रिकेट सट्टेबाजी चालवणाऱ्या मोहम्मद सादिक मल्लीदावर, मोहसीन मोहम्मद हनीफ खलिफा आणि सुफियान शेख यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. हे तिघे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजीचे जाळे चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुसऱ्या कारवाईत खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने कॉलेज रोड परिसरात रिव्हॉल्वर दाखवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या गोकाक येथील शंकर बसवराजा बंदीवड्डर याला अटक केली. त्याच्याकडून रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आले आहे.
शहरातील वाढत्या अवैध सट्टेबाजी आणि शस्त्र बाळगण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून पुढील तपास सुरू आहे.








