• अतिक्रमणधारकांना दणका

बेळगाव : शहराच्या सौंदर्यीकरणासाठी बेळगाव महापालिकेने अनधिकृत अतिक्रमणांविरोधात मोहीम तीव्र केली असून फूटपाथ आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर आज हिंडलगा रस्त्यावर उभारलेली खोकी हटवून प्रशासनाने मोठी कारवाई केली.

फूटपाथ आणि बेकायदा होर्डिंग्ज हटवल्यानंतर आता महापालिकेने अनधिकृत खोक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत हिंडलगा गणेश मंदिराजवळील रस्त्यावर उभारलेली सुमारे १० ते १५ खोकी जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली.

या कारवाईदरम्यान रस्त्याच्या जागेत आलेले बारचे फलक आणि मोठे जाहिरात फलक देखील हटवण्यात आले. उपजीविकेचे साधन असलेल्या दुकानांवर कारवाई होत असल्याने काही व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला, यावेळी व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला.

मात्र, विरोधाची पर्वा न करता महापालिकेच्या पथकाने सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. शहरात यापुढेही अशाच प्रकारे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू ठेवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.