- बेळगावात ब्राह्मण महासभेचे आंदोलन
बेळगाव : सीईटी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास भाग पाडल्याच्या प्रकारावरून बेळगावमध्ये वाद निर्माण झाला असून अखिल भारतीय ब्राह्मण महासभेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.
परीक्षेदरम्यान जानवे, मंगळसूत्र आणि बांगड्या काढण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत या नियमामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे जिल्हाध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी सांगितले की, “सीईटी परीक्षेच्या नावाखाली अशा प्रकारचे निर्बंध लादणे हे संविधानाने दिलेल्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे. जानवे केवळ ब्राह्मण समाजापुरते मर्यादित नसून इतर समाजातील नागरिकही ते परिधान करतात. त्यामुळे अशा प्रकारे वागणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात ब्राह्मण समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








