• नातेवाईकांकडून हुंडाबळीचा आरोप

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात गुरुवारी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ करून तिचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संगीता गाडीवड्डर असे मृत महिलेचे नाव असून तिचा विवाह व्यंकटेश गाडीवड्डर याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळापासून पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

घर बांधण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावेत, असा दबाव पती व्यंकटेश सतत टाकत होता. मात्र पैसे देणे शक्य नसल्याने घरात वारंवार वाद होत होते. या कारणावरून पती आणि नणंद तिचा छळ करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मृत महिलेची आई कस्तूरी यांनी, “केवळ दीड महिन्यातच माझ्या मुलीचा जीव घेतला. दोषींना कठोर शिक्षा मिळावी,” अशी मागणी केली आहे. तसेच तिच्या बहिणींनीही पतीवर गंभीर आरोप करत मारहाणीच्या खुणा शरीरावर असल्याचे सांगितले असून, हा खून करून आत्महत्येचा बनाव असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की खून, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.