• अनेकजण गंभीर जखमी

संकेश्वर : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर क्रॉसजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला असून टेम्पो ट्रॅव्हलर आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरमधून सुमारे १४ प्रवासी महाराष्ट्रातील इचलकरंजी येथून गडहिंग्लजजवळील शिंदेवाडी येथे लग्नासाठी निघाले होते. हुक्केरी तालुक्यातील सोलापूर क्रॉस परिसरात पोहोचताच टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की, टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावर तीन वेळा कोलांट्या घेतल्या. त्यामुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.